आयुष्यभर काबाडकष्ट, जन्माला घातलेल्या मुलांकडून सोनेरी स्वप्नांची अपेक्षा, उतरत्या वयात आधाराच्या काठीची अपेक्षा, हे सर्व सोनेरी स्वप्न बघता बघता कधी उतरत्या वयात येतो त्यालाही कळतंच नसते, शरीर कमजोर होत जाते,तेव्हा आयुष्याच्या उत्तरार्धात होणारी कुचंबणा,ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे…मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचारस्ता दाखवला नाहीये, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदाऱ्या म्हाताऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतलाआहे आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आईबापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत….आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की, अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहितीतील कित्येक मुलांनी म्हाताऱ्यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन,त्यांना घरात बिन पगारी व विश्वासू घर गडी किंवा मोलकरीण गृहीत धरुन, घरातील सर्व जबाबदाऱ्या गोड गोड बोलून त्यांच्यावर टाकतात एवढेच नाहीतर स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारी टाकून स्वत:च्या करिअरकडे त्यांनी लक्ष दिले आहे. साधारणत: साठी पासष्ठीनंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष इतक्या वर्षाच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो..! मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. अशावेळी या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते…पण नकळत पणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो…म्हाताऱ्या अजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असं नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने त्यांना रोज नातवंडांना न्हाऊमाखू घालणं, जेवण देणं, त्यांना इकडून तिकडे कडी खांद्यावरून फिरवणे, त्यांना हवं नको ते पहाणं हे शक्य होईलच असं नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणं भागच होऊन जातं, तोंड दाबून बुक्क्यांचा मारा होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करिअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचं कसं होणार..? डे-केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल..? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का..? असे अनेक प्रश्न म्हाताऱ्यांनाच पडतात. आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात…..एकदा जबाबदारी स्विकारली की मग स्वत:चं आरामाचं वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधलं जातं..!लटकेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला आंघोळ घालणे किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूलबसपर्यंत सोडायला जाणं इथपासुन ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला, जेवायला देणे, झोपवणे ही कामं करावी लागतात..
नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमीजास्त झालं किंवा त्याची तब्येत बिघडली की…”लक्ष कुठे असतं..! हो..sss तुमचं..? किंवा “तुमच्याच आईने’ काहीतरी खाऊ घातलं असेल माझ्या पोराला” sss..!असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हाताऱ्यांना..? कधीकधी तर संध्याकाळी सुन किंवा मुलगा आला की स्वत:चालॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या जेवणाचंही सासुबाईंनाच बघावं लागतं..सुन असते,हाय-कॉलिफाईड…त्यामूळे तिला बोलून चालणार नसतं…एखादा शब्द जर कमीजास्त झाला. तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघू लागतो….वर वर छान दिसणा़ऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदिस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत…इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत पण विश्रांती नाही, जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत, थकलेल्या शरीराला आराम नाही.
बाहेरील देशात मुलाकडॆ कौतुकाने गेलेले आई व वडील चार महिन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवरआलेले, मी स्वत: बघितले आहेत. कालपरवापर्यंत मुलाच्या बाहेरीलदेशाच्या नोकरीचं कौतुक करणारेआई व वडील यानंतरपुन्हा बाहेरील देशात मुली -मुलाकडे जायचं नावही घेत नाहीतत्यामागे हीच कारणं आहेत.
तुम्हाला मुलंबाळं जन्माला घालून जर त्यांचं करणं झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे-केअर सेंटरवर ठेवा की….तुमचं करिअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलंच जन्माला घालु नका हे बेस्ट नाही का ..?आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वत: करिअरच्या नावाखाली नामानिराळे राहिलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते. असं माझं स्पष्ट वयक्तिक मत आहे. कारण ह्या स्वप्नांच्या सोनेरी आशयानासाठी (बंगला) खूप काबाडकष्ट त्यांनी केलेले असतात. सर्व सुख सुविधांयुक्त बनवलेला तो आलिशान आशियानाअसतो. मुलांने जरी त्यांचे आयुष्यभर सोबत राहून आई-वडिलांची सेवा देखभाल केली तरिही बँक बॅलन्स संपणार नाही.ऐवढी मोठी जमवाजमव केलेली असते. परंतू तेच मुले सुंदर आशियाना सोडून उतरत्या वयातील आई-वडिलांनाही सोडून दूर राहतात किंवा त्या आशियानातील (बंगल्या ) खोलीत बंदिस्त राहावे लागते. यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही. हा सर्वात मोठा त्रास आहे..! माझ्या जवळीकचे कित्येक उदाहरणे आहेत,शेवटच्या क्षणालाही जवळपास कोणीही नसते आणि त्यांनी कधी त्यांचा देह त्यागिला माहित नसते काही वेळेला रात्री जेवण दिलेले असते, तेही तसेच पडलेले असते जेव्हा दुपारचे जेवण देण्यासाठी बंद खोलीत जातात तेव्हा मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळून येते तेव्हा त्यांची तारांबळ उडते आणि नातेवाइकांनाही न कळवता अंतीम पटकन उरकून घेतला जातो. असे झालेले हे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही माहिती होऊ देत नसते. काही वेळेला मी असेही बघितले की, बरेच म्हातारे एकटेच राहत्तात. मी जेष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांसाठी काम करत असताना काही असेही आढळून येते की, कोणाच्याही सानिध्यात न राहणारे वयोवृद्ध कधी मरून पडतात हे कोणालाच माहिती नसते आणि त्या मानवी देहातू दुर्गंधी येऊ लागते, तेव्हा आजूबाजूला राहणारे .. की त्याच्या कडे दुरूनच कधीतरी बघणाऱ्यांच्या लक्षात येते की, हि व्यक्ती चार-पाच दिवस झाले..! दृष्टीस पडली नाही. तेव्हा संशय येतो व सुंदर सोनेरी पिंजऱ्याच्या दारातून खिडकीतून त्या येणाऱ्या दुर्गंधीचा शोध लागतो. म्हणूनच मला म्हणावंसं वाटत की, या धावपळीच्या युगातील हे नवे “बंदिस्त सोनेरी वृध्दाश्रमे ” स्वतःचे स्वप्नातील सुंदर सोनेरी आशियाने (बंगलो) हे यातनांचे माहेर घर बनले आहेत …! म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की,हे नवे “बंदिस्त सोनेरी वृध्दाश्रम” असू शकतील. संकलन :- टि.एल नवसागर.