उतरत्या वयामध्ये मिळाली “बहिण” झाले, आनंद आश्रू अनावर…

नाशिक प्रतिनिधी :  बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन..!
“मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम” परिवारातील  आजीबांईनी आपल्या सोबत आयुष्यभर राहणाऱ्या समवयस्क आजी – आजोबांच्या लडखडणाऱ्या हाताला बांधला ऋणानुबंधनाचा बहिण – भावाच्या नात्याचा रक्षाबंधनाचा धागा ! उतरत्या वयामध्ये मिळाली “बहिण” झाले, आनंद आश्रू अनावर ! रक्ताच्या नात्यातील बहिणीने फिरविली पाठ परंतु मानवसेवेच्या नात्यातून निर्माण झाली उतरत्या वयात वृद्धाश्रमात बहीण भावांची नाती.
आज प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम या संस्थेच्या वतीने समवयस्क आजी – आजोबांसाठी  “रक्षाबंधनाच्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
    या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अपंगत्व वित्त, सामाजिक न्याय मंत्रालयाचे माजी व्यवस्थापकीय संचालक. मा. श्री. रमेशजी बनसोड सर यांनी कार्यक्रमाला धावती भेट दिली.
समवयस्क आजी – आजोबांसाठी “रक्षाबंधनाच्या” कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांचे स्वागत संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री. टि.एल. नवसागर यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
    या कार्यक्रमाच्यानिमित्यांनी वृद्धाश्रमाची पाहणी करून जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांच्याशी हितगुज करून वयोवृद्धांची मने जिंकली.
   त्याच क्षणी ८० ते ८५ वयातील आजी आपल्या लडखडणाऱ्या पायावर काठीचा आधार घेत, कार्यक्रमाच्या व्यासपीठाजवळ आल्या व रक्षाबंधनाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी रमेशजी बनसोड साहेबांचे ॵक्षण करून त्यांना राखी बांधली
   उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी ती कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे.
   त्याच प्रकारे या समाजातील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध निराधार यांचे उतरत्या वयात निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी ही संस्था कार्यरत असल्याने, ह्या संस्थेची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाने स्विकारली पाहिजे.
  हिच जबाबदारी घेत या कार्यक्रमात मा.श्री.रमेशजी बनसोड साहेबांनी रोख १०,००० रुपये संस्थेसाठी आर्थिक देणगी दिली.
या कार्यक्रमानिमित्त उपस्थित  सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.भाऊराव वानखेडे, श्री. रमेश घनसावंत व तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. टि.एल. नवसागर, सचिव.श्री.सुभास सावंत, संचालिका.सौ.ललिता नवसागर, श्री. भगवान सावंत, श्री.दत्तराव सावंत, कु.दिनेश सावंत, कु.सुशांत नवसागर, कु.तेजस नवसागर, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे श्री. अशोक नागपूरे सर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता संचालिका सौ ललिता नवसागर यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *